मोबाईलवर बोलताना घडलं भयंकर! रेल्वेने उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, थेऊर फाटा येथील घटना..

लोणी काळभोर : रेल्वे रुळावरून मोबाईल वरून बोलत जात असताना मागून आलेल्या रेल्वे धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक परप्रांतीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखाली गुरुवार (ता.७) रोजी सायंकाळी सव्वा सातवाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या घटनेत बंटी राजा परमार (वय ३९, रा. ग्राम पिप्रोदा उबारी, शिवपुरी- मध्यप्रदेश) याचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंटी हा लोणी काळभोर परिसरात कामाच्या शोधात आला होता. त्याला काम मिळाले होते. आणि कामातून मिळालेल्या पैसे तो घरी पाठवत होता.
गुरुवारी बंटी परमार हा मोबाईल वरून बोलत पायी चालला होता. थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखालून तो जात असताना त्याला रेल्वेने जोरदार धडक दिली. अशी माहिती प्रथमदर्शनी व्यक्तींनी दिली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत व प्रसाद ताम्हाणे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर पोलिसांनी तत्काळ महाराजा रुग्णवाहिकेला बोलावले. जखमी बंटी परमार याला रुग्णवाहिकेतून लोणी काळभोर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
पोलीस हवालदार चंद्रकांत माने यांनी बंटी परमार यांच्या मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. आत्महत्या की अपघात त्यादृष्टीने लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.