ताम्हिणी घाटात बसचा भीषण अपघात; 27 प्रवासी जखमी तर 10 जण गंभीर, कारलाही उडवलं

पुणे: रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा ताम्हिणी घाट हा आता मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या घाटात एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून यातील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोसरी परिसरातून ही बस फिरण्यासाठी निघाली होती.बसमध्ये भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे 50 कर्मचारी होते. हे सर्वजण काशिद बीचला फिरायला जात होते.दरम्यान दुपारी ही खाजगी बस ताम्हीणी घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला.यावेळी खासगी बसने एका कारला देखील उडवलं आहे.या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील प्रवासी जागीच जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे

