निगडी परिसरात भयंकर अपघात! भरधाव कारच्या धडकेत 59 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरात वारंवार अपघाताची सत्र सुरूच आहे.शुक्रवारी सायंकाळी भरधाव वेगाने आलेल्या कारने एका 59 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाला मागून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, रामखिलवान यादव असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास
चिखली येथील थर्मॅक्स चौक ते आकुर्डीतील खंडोबा माळ या रस्त्यावरते पायी जात असताना मागून वेगात येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान यादव यांना मृत घोषित करण्यात आले.
पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ दिवाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख संजय रमेश जिंदाल अशी झाली आहे. तो कार भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे शहरातील वाहनचालकांबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.