पुण्यातील ताम्हीणी घाटात भीषण अपघात ; दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, 15 प्रवासी गंभीर जखमी..

पुणे : पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात दोन एसटी बस समोर समोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे.या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन–बीड ही एसटी बस कोकणातून पुण्याकडे येत होती, तर चिंचवड–खेड ही एसटी पुण्याहून कोकणाकडे जात होती. ताम्हिणी घाटाजवळील एका तीव्र वळणावर श्रीवर्धन–बीड बसच्या चालकाचा अचानक गाडीवरचा ताबा सुटला. ब्रेक नीट लागला नाही आणि बस डोंगराच्या कडेला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याच क्षणी समोरून चिंचवड–खेड एसटी बस येत होती आणि दोन्ही गाड्यांची जोरदार धडक झाली. या धडकेत 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, प्रवासी आणि महामार्गावरील इतर वाहनचालक मदतीला धावून आले. त्यांनी जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून तातडीने पौड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार सुरू आहेत आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
