पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी वातावरणात तणाव ; महायुतीच्या नेत्यांनी केली ‘ही ‘मागणी

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र महायुती सरकारचा प्रभाग रचनेवर असलेला वरदहस्त पाहता पुणे महापालिकेची संभाव्य प्रभागरचना आपल्या मर्जीनुसार व्हावी, यासाठी महायुतीतील तिन्ही घटकपक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडून महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना याबाबत मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.

महायुती सरकारचा प्रभाग रचनेवर असलेला वरदहस्त पाहता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन थेट राज्यपालांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तातडीने नगरविकास विभागाला सादर करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत.दरम्यान पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय हस्तक्षेपामुळे हा आराखडा अंतिम करण्यास विलंब होत असल्याची महापालिका वर्तुळात चर्चा आहे.
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांतील नेत्यांकडून आपापल्या सोयीची प्रभागरचना करण्यासाठी धरलेल्या हट्टामुळे महापालिकेतील अधिकारी बेजार झाले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे या आराखड्यास विलंब होत आहे.
