ऐन अधिवेशनात शिक्षकांच आंदोलन ; शालार्थ आयडी घोटाळ्याचा फटका, 10 महिन्यांपासून वेतन रखडलं

नागपूर:नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी शिक्षकांनी सकाळपासूनच आंदोलन केल्यानं वातावरण तापलं आहे. शालार्थ आयडी घोटाळा झाल्यानंतर 10 महिन्यापासून शिक्षकांचं पगार रखडला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे नागपुरात शिक्षकांचं मागील 7 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ऐन अधिवेशनात नागपूरच्या यशवंत स्टेडियम या ठिकाणी शिक्षकांनी आंदोलन केलं आहे.शालार्थ आयडी प्रकरणामुळे नागपूर जिल्ह्यातील 622 शिक्षकांचे मागील 10 महिन्यांपासून वेतन रखडले असून, यासंदर्भात उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही वेतन अदा करण्यात आलेले नाही, असा आरोप शिक्षकांनी केला आहे. आज तरी याबाबत ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा आंदोलकर्ते शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षण विभागाच्या ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून नियमित वेतन घेतल्या प्रकरणी नागपूर सायबर पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. राज्य शासनानची तब्बल 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन बोगस शिक्षकांना अटक झाली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यात आतापर्यंत 17 आरोपींना अटक झाली आहे. या घोटाळ्याचा फटका शिक्षकांना बसला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन काल लोटांगण घातलं होतं. त्यानंतर पोलीस आणि प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड वाद झाला होता. पोलिसांनी त्यांच्या 28 सहकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आज पुन्हा हे प्रशिक्षणार्थी यशवंत स्टेडियम या ठिकाणी एकत्रित झाले असून आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर आज पुन्हा लोटांगण आंदोलन घालू असा इशारा दिला आहे. दरम्यान आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी शिक्षकांच्या आंदोलनाला यश मिळणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

