माळेगाव कारखान्याच्या पराभवानंतर तावरेंची मोठी घोषणा! आभार सभेत म्हणाले, आता अजित पवार यांच्याविरुद्ध…

बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलने विजय मिळवला. यानंतर अजित पवार यांनी कारखान्याची धुरा हातात घेत कारभार सुरू केला आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सहकार बचाव पॅनेलची आभार सभा झाली. त्यावेळी चंद्रराव तावरे बोलत होते.

तावरे म्हणाले, महाराष्ट्रात ऊस दराची स्पर्धा कायम रहावी. यासाठी सहकार क्षेत्रातील माळेगाव साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात असावा, अशी मनोमन इच्छा बहुमतांशी शेतकऱ्यांची होती. असे असताना पैसे घेवून लाचार झालेल्या काही सभासदांनी चुकीचा निर्णय घेतला आणि आमचा पराभव झाला, असेही ते म्हणाले.

सात हजारपेक्षा अधिक मतदान आपल्याला झाले. त्या पाठिंब्याच्या जोरावर यापुढेही सभासदांच्या भल्यासाठी लढत राहणार आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचे विस्तारिकरण करून अधिकाधिक ऊस गाळपासाठी आमचा आग्रह असणार आहे, असेही ते म्हणाले.

तसेच यावेळी ते म्हणाले, सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायम ठेवण्यासाठी माळेगावचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरूद्ध रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे यापुढे देखील लढत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यांनी गैरमार्गाने निवडणूक जिंकली. नवीन चेअरमन यांनी केवळ रस्ते बांधून आणि इमारतींना रंगरंगोटी करू नये. धोरणात्मक निर्णय घेऊन माळेगावचे विस्तारिकरण करावे, डिस्टलरी मोठी करावी आणि सभासदांना अधिकचे दोन पैसे द्यावे, नाहीतर आम्ही तयारी केली आहे.
