बायको आणि आई-बापाला मारुन आलोय! लेकरु घेऊन तरुण पोलिस स्टेशनमध्ये अन्…
आसाम : आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणानेपत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या केली. तसेच तिघांच्या हत्या करुन त्याने ९ महिन्यांच्या मुलासह पोलीस ठाणे गाठले.
आपण तिघांची हत्या केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आणि आत्मसमर्पण केले. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनी त्याने सांगितलेले ठिकाण गाठले. तिथे तिघांचे मृतदेह होते.
नाजीबूर रहमान बोरा असं आरोपीचे नाव आहे. त्याने चाकूने भोसकून तिघांना संपवल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, नाजीबुर रहमान बोरा आणि संघमित्रा घोष यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये झाला होता. नाजीबुर मॅकेनिकल इंजिनीअर आहे. जून २०२० मध्ये तो फेसबुकच्या माध्यमातून संघमित्राच्या संपर्कात आला.
काही महिन्यांनंतर दोघे पळून कोलकात्याला गेले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी लग्न केलं. संघमित्राचे आई-वडील तिला पुन्हा घरी घेऊन आले. २०२१ मध्ये त्यांनी संघमित्रावर घरात चोरी केल्याचा आरोप केला.
पोलिसात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. त्यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत राहावे लागलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर ती आई, वडिलांकडे राहू लागली.
जानेवारी २०२२ मध्ये संघमित्रा आणि नाजीबुर पुन्हा एकदा पळाले. यावेळी दोघे चेन्नईला गेले. तिथे ५ महिने राहिले. दोघे आसामला परतले, त्यावेळी संघमित्रा गर्भवती होती. ती नाजीबुरसह त्याच्या घरी राहत होती.
गेल्या नोव्हेंबरमध्ये तिला मुलगा झाला. यानंतर चार महिन्यांनी संघमित्राने नाजीबुरला सोडले आणि ती आई, वडिलांच्या घरी गेली. तिने नाजीबुरविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. नाजीबुर मारहाण करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले. त्यानं हत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा केला. यानंतर नाजीबुरला अटक झाली.
नाजीबुरला २८ दिवसांनी जामीन मिळाला. मुलाला भेटण्यासाठी तो संघमित्राच्या घरी पोहोचला. मात्र संघमित्राच्या आई वडिलांनी त्याची भेट होऊ दिली नाही. २९ एप्रिलला नाजीबुरच्या भावानं संघमित्रा आणि तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस तक्रार नोंदवली.
२४ जुलैला दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. मुलाला भेटू देत नसल्याने नाजीबूर संतापला. त्याने पती आणि तिच्या आई, वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्याने ९ महिन्यांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि गुन्ह्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून या घटनेचं पुढील तपास करीत आहेत.