महिलांच्या परवानगीशिवाय फोटो, व्हिडीओ काढताय?, सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय, जाणून घ्या..


नवी दिल्ली : मोबाईलमध्ये कॅमेरा आल्यापासून फोटो काढण्याचा ट्रेण्ड वाढलाय. आपल्या आजुबाजूला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टींचा आपण सहज फोटो काढतो. पण आता फोटो काढताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

कारण यात महिलांचे फोटो असतील आणि त्यांच्या परवानगीविना असतील तर तुम्हाला ते महागात पडू शकते, याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण तुमच्यावर कधी गुन्हा दाखल होऊ शकतो? सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना यासंदर्भात निर्णय घेतला आहे.

महिला कोणतेही खासगी कृत्य करत नसताना तिचे फोटो किंवा व्हिडीओ तिच्या संमतीशिवाय काढले, तरी भारतीय दंड संहिता कलम ३५४सी अंतर्गत वॉयरिझमचा गुन्हा लागू होत नाही. मात्र खासगी कृत्यांचे चित्रीकरण हा गंभीर गुन्हा मानला जातो. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

       

ममता अग्रवाल आपल्या मैत्रिणीसोबत आणि काही कामगारांसह एका मालमत्तेत प्रवेश करत असताना तुहिन कुमार बिस्वास यांनी त्यांना अडवून संमती न घेता फोटो व व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३५४सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र न्या. एन. कोटीश्वर सिंह आणि न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील तथ्यांचा बारकाईने विचार करून गुन्हा रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी घेतली. न्यायालयाने स्पष्ट केले की आयपीसी ३५४सी मध्ये नमूद केलेली ‘खासगी कृत्य’ ही संकल्पना अत्यंत विशिष्ट आणि मर्यादित आहे. महिला कोणतीही खाजगी कृती करत नसताना तिचे फोटो किंवा व्हिडीओ घेण्यात आले, तर ते वॉयरिझमच्या परिभाषेत येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने पुढे सांगितले की वॉयरिझमची तरतूद तेव्हा लागू होते जेव्हा एखादी महिला अशा परिस्थितीत असते जिथे गोपनीयता मिळणे स्वाभाविकपणे अपेक्षित असते. यात प्रसाधनगृहाचा वापर, कपडे बदलण्याची वेळ, शरीर अंशतः किंवा पूर्णपणे उघडे असणे किंवा लैंगिक स्वरूपाचे कोणतेही कृत्य करणारी परिस्थिती यांचा समावेश होतो. अशावेळी तिचे चित्रीकरण करणे किंवा पाहणे हा गुन्हा ठरतो.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की कलम ३५४सी ही तरतूद सामान्य परिस्थितीत महिलेचे फोटो किंवा व्हिडीओ घेण्याबाबत लागू होत नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोपीवर वॉयरिझमचा गुन्हा बनत नसल्याचे सांगत खंडपीठाने गुन्हा रद्द करण्याची दिशा दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!