धक्कादायक! पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग, हडपसर पोलिसांनी एकला ठोकल्या बेड्या..
पुणे : पीएमपीमधून जाताना गर्दीत युवतीच्या पाठीवरुन हात फिरवून तिचा विनयभंग करणार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार हडपसरमधील गाडीतळ येथे शनिवारी (ता.१२) सायंकाळी साडेसहा वाजता घडला.
प्रतिक रामबृज जैस्वाल (वय २०, रा. बरसेरवॉ, पो. बहादूरपूर, आजमगड, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हांडेवाडी येथील एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी या हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉप येथून बसमध्ये चढत होत्या. त्यांच्या मागोमाग आरोपी प्रतिक हा चढत असताना त्याने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला व त्यांच्याशी अश्लिल चाळे केले.
तेव्हा या युवतीने हिंमत दाखवून त्याला मारले. तरीही तो तिचा पाठलाग करुन पुन्हा तिच्या पाठीमागे हात फिरवून तिचा विनयभंग केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.