लोणी काळभोर येथे चोरट्यांचा धुमाकूळ! दिवाळीत मूळगावी गेल्याचा फायदा घेऊन घरफोडी, ‘एवढ्या’ लाखांचा ऐवज केला लंपास…

लोणी काळभोर : दिवाळीनिमित्त सर्वजण मूळगावी गेल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सुमारे 4 लाखांचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले असल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बाजारमळा परिसरात घडली आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी घरमालक बालाजी लक्ष्मण कुरवडे (वय ३२, रा. सर्वे नंबर २३०८, बाजारमळा, लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालाजी कुरवडे हे इलेक्ट्रीकलची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. दिवाळीनिमित्त सर्वांना सुट्टी असल्याने दरवर्षी प्रमाणे कुरवडे हे त्यांच्या मूळगावी मु.पो.उंद्री (ता. केज जि.बीड) येथे बुधवारी (२२ ऑक्टोबर) रोजी गेले होते.

शनिवार (२५ ऑक्टोबर) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कुरवडे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांचे शेजारी संतोष देशमुख यांना दिसला. म्हणून त्यांनी कुरवडे यांचेशी मोबाईल वरून संपर्क साधला व तुमच्या घराचा दरवाजा उघडा आहे, तुम्ही गावावरून परत आला आहात का? अशी विचारणा केली. त्यावेळी कुरवडे यांनी आम्ही आमच्या घराला कुलूप लावून गावी आलेलो आहोत. अजूनही आम्ही गावीच आहोत. असे सांगितले.
कुरवडे यांनी देशमुख यांना घरात जाऊन पाहणी करण्यास सांगीतले. तेव्हा त्यांना बंद घराचे कुलूप कोणीतरी तोडुन घरातील कपडे इतरस्त पडलेले आढळून आले. चोरट्यांनी कुरवडे यांच्या घरातील ९० हजार रुपयांची रोख रक्कम, ५ ग्रॅमचे मणी मंगळसुत्र, ६ ग्रॅमची कानातील झुमके, १३ ग्रॅमच्या अंगठ्या, ३ ग्रॅम कानातील काड्या, १ ग्रॅम कानातील कुडके व १ ग्रॅमचा गळ्यातील बदाम असे एकूण २ तोळे ९ ग्रॅम सोने असा ऐवज चोरून नेला आहे. या सर्व मुद्देमालाची चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे ४ लाख रुपयांची किंमत होत आहे.
कुरवडे हे गावावरून परत आल्यानंतर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करत आहेत.
