LPG वापरकर्त्यांसाठी इशारा! PNG कनेक्शन घ्या, नाहीतर पुरवठा अडचणीत’; मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य…

पुणे : सध्या सरकारकडे एलपीजी सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असला, तरी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पीएनजी (पाईप्ड नॅचरल गॅस) जोडणीवर भर दिला जात असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

येत्या तीन महिन्यांत शक्य त्या सर्व ठिकाणी पीएनजी कनेक्शन देण्याचा वेग वाढवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्या ठिकाणी पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही नागरिकांनी त्याचा लाभ घेतला नाही, तर भविष्यात एलपीजी सेवा बंद होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबत केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत, राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्कचा विस्तार अधिक वेगाने होणे आवश्यक असल्याचे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक शहरांमध्ये एलपीजीसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत शासनाची भूमिका स्पष्ट केली.
छगन भुजबळ म्हणाले, युद्धाचा परिणाम केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर होत आहे. इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पंतप्रधान आणि त्यांच्या अधिकाऱ्यांकडून विविध देशांशी चर्चा करून पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चाळीसहून अधिक देशांशी याबाबत संवाद साधण्यात आला आहे.
सुदैवाने Strait of Hormuzमार्गे जाणाऱ्या भारतीय जहाजांना विशेष परवानगी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या परिस्थितीत विविध अफवा पसरत असून ‘हे बंद होणार, ते बंद होणार’ अशा चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केले आहे की राज्यात घरगुती गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे आणि पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही, असेही छगन भुजबळ यांनी ठामपणे सांगितले.
अनेकांनी पीएनजी (पाईप नॅचरल गॅस) घेतले नाही. जिथे पीएनजी मिळविण्याची सोय आहे तिथेही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. ३ महिन्याच्या आत सगळ्यांनी पीएनजी सुरू करायचा आहे. ज्यांना पीएनजी हवा आहे, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.
संबंधित कंपन्यांना शहरातील भाग वाटून दिले आहेत. मुंबई- ठाणे-नवी मुंबई इथे महानगर गॅस आहे. अशा प्रकारे विविध कंपन्यांना भाग दिले आहेत. लोकांना अर्ज कुठे द्यावे हे कळत नाही. त्यांनी तो आमच्या पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे द्यावा. मला पीएनजी हवा आहे, असे अर्जात नमूद करून पत्त्यासह पुरवठा विभागाकडे अर्ज द्या.
अधिकाऱ्यांनी ते अर्ज त्वरेने गॅस एजन्सीकडे जमा करावेत, असे निर्देश भुजबळ यांनी दिले. तसेच शक्य असूनही पीएनजी गॅस घेतला नाही तर LPG बंद होऊ शकतो, असा इशाराही भुजबळ यांनी दिला. जर तुम्ही अर्ज केला असेल आणि काही कारणांनी तुमच्याकडे पीएनजी कनेक्शन आले नाही तर समजू शकतो. पण तुम्ही अर्जही केला नसेल तर मात्र तुमचा एलपीजी बंद होऊ शकतो, असे भुजबळ म्हणाले.