AI ची मदत घ्या पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका!! बारामती AI करिअर व संधी कार्यशाळेत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं मत…

बारामती : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित एआय क्षेत्रातील करिअर व संधी या विषयावर आयोजित कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, एआय ने तंत्रज्ञानात मोठे बदल घडवले आहेत.
पण तरीही ते मानवी मनाची भावभावनांची जागा घेऊ शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान जरूर शिका पण आपल्या बुद्धिमत्तेला कधीही विसरू नका कारण आपण जी माहिती त्या तंत्रज्ञानाला देत आहोत, तीच माहिती तो आपल्याला देत आहे. एआय ने अनेक गोष्टी करता येतात पण ओरिजनल हे ओरिजनल असते, हे विसरून चालणार नाही असे आवर्जून सांगितले.
यावेळी नवीन तंत्रज्ञानाच्या चुकीच्या पद्धतीनेही वापर होऊ शकतो असे सांगितले. स्वतः च्या बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवा, नवीन तंत्रज्ञान शिका आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करुन करिअर निर्माण करा असा सल्ला दिला. एआयची मदत घ्या पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका त्याची मदत घेऊन समाजाची सेवा करा, असे आवर्जून सांगितले.
यावेळी त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले. त्या म्हणाल्या पवार साहेब कधीच सर्व्हेवर विश्वास ठेवत नाहीत, ते आपल्या अनुभवावर आणि बुद्धीवर विश्वास ठेऊन निर्णय घेतात. त्यामुळे साठ वर्ष झाले ते राजकारण यशस्वी होत आहेत, असे सांगितले. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आत्मसात जरूर करा पण त्याला आपल्या बुद्धिमत्तेच्या वरचढ होऊ देऊ नका असे आवाहन केले.
याप्रसंगी लेखक व उद्योजक अच्युत गोडबोले, वाॅशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक डाॅ. लव खोत, आरजीएसटीचे सचिव डाॅ. नरेंद्र शहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डाॅ. आदित्य अभ्यंकर, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांच्यासह विद्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सभासद आदी उपस्थित होते.