लोणीकंद येथील तडीपार गुंडाला पोलिसांनी घेतले ताब्यात ! तडीपार असून फिरत होता मोकाट…!
उरुळी कांचन : पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला युनिट सहाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ओंकार शंकर गुंजाळ ( लोणीकंद, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण ३० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात धारदार शस्त्रे, अग्निशस्त्र बाळगणे व त्याचे साह्याने गून्हे करणाऱ्यांवर प्रतिबंध करण्याची उपाय योजना करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार युनिट सहाचे पथक बुधवारी (ता. ०१) गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे व ऋषीकेश ताकवणे यांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर मधून दोन वर्षाकरिता तडीपार असलेला ओंकार गुंजाळ हा पुणे शहर हद्दीमध्ये वाघोली येथे आलेला असून त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,वाघोली येथील परिसरात सापळा रचून ओंकार गुंजाळ याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतुसे असा एकूण ३० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर लोणीकंद, अहमदनगर या पोलीस स्टेशन मधे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर, यांच्या मार्गदर्शानाखाली युनिट ६चे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, पोलीस हवालदार मच्छिंद्र वाळके, पोलीस नाईक विठ्ठल खेडकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार यांनी केली आहे.