स्वारगेट अत्याचार प्रकरण ; आरोपी दत्ता गाडेचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला..


पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने त्याचा दुसरा जामीन अर्ज फेटाळला आहे.आरोपीने महिलेविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असून, या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असे निरीक्षण नोंदवित अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी गाडेला जामीन देण्यास नकार दिला आहे.

स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी गाडेविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गाडेने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी केलेला पहिला अर्ज सत्र न्यायालयाने ३० जून रोजी फेटाळला. त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत गाडेने पुन्हा आपल्या वकिलांमार्फत दुसरा जामीन अर्ज सादर केला. ॲड. वाजेद खान बिडकर यांच्या मागणीला विशेष सरकारी वकील अजय मिसार आणि पीडितेच्या वकील ॲड. श्रीया आवले यांनी विरोध दर्शविला. त्यानंतर आरोपीचा दुसरा जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आला.

पुणे सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही त्याच्याविरोधात आरोप निश्चिती करण्यासाठी पुढील सुनावणीला न्यायालयात हजर करण्याचे आदेशही पुणे पोलिसांना दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!