नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा संशय, चुलत भावाला संपवण्यासाठी चार लाखांची सुपारी, पुण्यातील धक्कादायक घटना…

पुणे : नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून चुलत भावाचा खून करण्यासाठी चार लाकांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली. 17 नोव्हेबरला ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
कात्रजमधील गुजरवाडी परिसरात अजयकुमार गणेश पंडीत (वय. 22, सध्या रा. साईनगर, खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. हजारीबाग, झारखंड) याचा तीक्ष्ण शस्त्राने खून करण्यात आला होता.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून अजयकुमारचा चुलत भाऊ अशोक कैलास पंडित (वय. 35, सध्या रा. मोशी, पिंपरी-चिंचवड) याला अटक केली होती.

अजयकुमार पंडितचे त्याच्याच नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती अशोक पंडितला मिळाली होती. त्यानंतर त्यानेच गुंडांना सुपारी देऊन अजयची हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

अशोकने अजयकुमारचा खून करण्यासाठी साथादीर कृष्णकुमार विजयमहतो वर्मा (वय. 21), सचिनकुमार शंकर पासवान (वय 26) तसेच खुनातील पहिला साक्षीदार रणजितकुमार धनुखी यादव (वय. 30) यांना चार लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले.
या गुन्ह्यात तो स्वतःही सहभागी असल्याचे समोर आले. पुणे पोलिसांनी या चौघांचा शोध केला असता ते रेल्वेने झारखंडला पसार होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या चौघांनाही अटक केली.
