संशयालाच ‘हवा’! अजितदादांच्या विमान अपघाताच CCTV फुटेज देण्यास केंद्राचा नकार; ‘आरटीआय’ची थेट न्यायालयात धाव…

मुंबई: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका आणि प्रश्न उपस्थित केले जात असतानाआता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्राने नकार दिला आहे. या नकारामुळे अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी त्या दिवसाचे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागवले होते, परंतु केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक विभागाने ही माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.दरम्यान, यादव यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. यात त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयुक्त यांच्या विविध निकालांचे दाखले देऊन पुन्हा फुटेजची मागणी केली आहे.
दरम्यान नितीन यादव यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. “अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी आणि शासकीय जनसेवक होते. अशा महत्त्वाच्या व्यक्तीच्या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज नाकारणे हे अत्यंत धक्कादायक आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे हा घातपात असण्याच्या शंकेला अधिक बळ मिळत आहे असे त्यांनी म्हटले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या दिवशी पहाटे 6 ते सकाळी 9 या दरम्यान मुंबई विमानतळावर नक्की काय हालचाली सुरू होत्या, हे जाणून घेण्यासाठी नितीन यादव यांनी 10 फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. मात्र, अनेक वेळा पाठपुरावा करूनही केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने ही माहिती नाकारली आहे. त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.