सुशील हगवणे अडकला! जुना व्हिडीओ झाला व्हायरल, माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय….

पुणे : हुंडाबळी वैष्णवी हगवणे प्रकरणारे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले. या प्रकरणी रोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. अशातच आता आरोपी सुशील आणि राजेंद्र हगवणे यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओ मध्ये बाप लेकाची दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांमध्ये या व्हिडिओ मध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओत सुशील हगवणे घोड्यावर बसलेला दिसतो आणि म्हणतो, माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा! त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणे देखील उपस्थित आहेत.
या वक्तव्यानंतर हगवणे कुटुंबाची दादागिरी आणि वर्चस्व दाखवण्याची वृत्ती स्पष्ट होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. हा व्हिडिओ हगवणे कुटुंबाच्या एकूणच वर्तनावर प्रकाश टाकतो, ज्यावर आता नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात आतापर्यंत तिचा पती, सासू, नणंद, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर तपासात आणखी पाच आरोपींची नावे समोर आली असून, त्यात एका माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश असल्याची माहिती आहे. सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या व्हिडिओमुळे आरोपींच्या विरोधात आणखी पुरावा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडीओवर जोरदार चर्चा सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. वैष्णवीला न्याय मिळावा आणि अशाप्रकारे दादागिरी करणाऱ्यांना कायद्याने शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.