राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी अखेर भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशात सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत आपल्याला दिलेल्या जबाबदारीसाठी आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार.
शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ही मोठी घोषणा केली. मे महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.
त्या दिशेने पाऊले उचलत २ मे रोजी शरद पवारांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नंतर कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अशात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शरद पवारांनी आपला निर्णय जाहीर केला.