सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नाची तारीख ठरली, कुठं पार पडणार रेवतीचा विवाहसोहळा?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योजक अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्या लग्नाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. येत्या 20 जून रोजी त्यांचा विवाह मुंबईत संपन्न होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांच्या लेकीच्या लग्नाची अधिकृत घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली असून रेवती आणि सारंग यांचा मुख्य विवाह सोहळा मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मात्र त्यानंतर होणारे रिसेप्शन सोहळे मात्र अत्यंत दिमाखदार असणार आहेत.
रेवती आणि सारंग यांचा मुंबईत मुख्य विवाह सोहळा पार पडेल. मुंबईसह अन्य दोन ठिकाणी रिसेप्शन सोहळा पार पडेल. लखानी कुटुंबीय नागपूरचे असल्याने तिथे एक मोठं रिसेप्शन आयोजित केलं जाणार आहे.या भव्य विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सध्या दोन्ही कुटुंबांकडून सुरू आहे.

सारंग लखानी हे नागपूरमधील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चर’चे मालक अरुण लखानी यांचे चिरंजीव आहेत. सारंग यांनी परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण केले असून ते एक उत्तम बॅडमिंटनपटू देखील आहेत.
या विवाहामुळे पवार कुटुंबीय आता नागपूरचे व्याही होणार आहेत. विशेष म्हणजे, या सोयरिकीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगली होती. या भव्य विवाह सोहळ्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत