बारामतीतील’ त्या’ कॉलेजच्या अभ्यागत मंडळावरून सुप्रिया सुळेंची उचलबांगडी, सुनेत्रा पवार अध्यक्षपदी..

बारामती : पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत पुन्हा एकदा नंणद आणि भावजयात संघर्ष पाहायला मिळाला.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेच्या अभ्यागत मंडळावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त अन्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना 30 जानेवारी 2010 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे. या शासन निर्णयातील तरतुदींनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णायल बारामती या संस्थेच्या अभ्यागत मंडळावर राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय पाच शासकीय सदस्यांचा मंडळावर समावेश असेल.राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून ज्योती नवनाथ बल्लाळ,डॉक्टर कीर्ती सतीश पवार,डॉक्टर सचिन कोकणे,अॅड. श्रीनिवास वायकर,डॉक्टर दिलीप लोंढे,अविनाश गोफणे,बिरजू मांढरे या 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे

