युगेंद्रला साथ द्या!! माझ्याशी किंवा अजितदादांशी तुलना नको, लग्न करण्याचाही सल्ला, शरद पवार असं का म्हणाले?

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बारामती दौऱ्यावर होते. आज बारामतीमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून अनेकांनी युगेंद्र पवार यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
आज शरद पवार यांनी देखील युगेंद्र पवार यांना त्यांच्या पुढील राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या युवकांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला. युगेंद्र पवार यांची माझ्याशी किंवा अजित पवार यांच्याशी तुलना करू नका, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले, युगेंद्र पवार यांचं काम आत्तापर्यंत चांगलं आहे. इथून पुढे देखील त्याला साथ द्या, असे म्हणत युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवार यांनी ही साद घातली आहे. आता अक्षता टाकायचीही संधी द्या, असे म्हणत शरद पवार यांनी मिश्कील टिप्पणी केली आणि युगेंद्र पवार यांना लग्न करण्याचाही सल्ला दिला.
शरद पवार यांच्या निवासस्थानी युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी एकच हशा पिकला. आज बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांना साथ देण्याचे आवाहन केले आहे.