मोठी बातमी! सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, बॉलीवूडवर शोककळा…

मुंबई : अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना बारा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. नंतर त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले जात होते.

त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून ते घरी होते. पण आज त्यांच्या जुहूतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या प्रकृती अस्वास्थापासूनच वेगवेगळ्या बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या. यामुळे याबाबत अचूक माहिती समोर येत नव्हती.

अद्याप देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आलेत. यावेळी अनेकांनी उपस्थिती लावली असल्याचे सांगितले जात आहे. सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती.

त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला.
अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होते. धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल, रितेश देशमुख यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. अनेकांनी त्यांच्या जाण्यावर दुःख व्यक्त केले आहे.
