उन्हाळ्याच्या झळा वाढल्या! पुणे विभागातील ६५ गावे, ४२१ वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड, टँकरने पाणीपुरवठा सुरू…

पुणे : सध्या मोठ्या प्रमाणावर उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या असून तापमानात वाढ झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील मार्च महिना संपताच पुणे विभागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. शेतीच्या पाण्यासोबतच पिण्याचे पाणी देखील अनेक ठिकाणी लांबून आणावे लागत आहे. सध्या पुणे विभागातील ६५ गावे आणि ४२१ वाड्या-वस्त्यांच्या घशाला कोरड पडली आहे.
उन्हाळ्यात आतापासूनच गावे आणि वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. या सर्व गावांमधील मिळून सुमारे एक लाखांहून अधिक लोकसंख्या आणि २० हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी ६७ टॅंकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी टँकरची मागणी देखील वाढू लागली आहे.
पुणे विभागात सर्वाधिक ४१ टॅंकर्स हे सातारा जिल्ह्यात सुरु आहेत. कोल्हापूर जिल्हा मात्र अद्यापही टँकरमुक्त आहे. सध्या सुरु असलेल्या एकूण टॅंकर्समध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक ४१ टॅंकरबरोबरच सांगली जिल्ह्यातील २, पुणे २० आणि सोलापूर ०४ टॅंकर्सचा समावेश आहे. हा आकडा गरजेनुसार वाढणार आहे.
पुणे जिल्ह्यातील २२ गावे १२१ वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही गावे आणि वाड्या-वस्त्यांना सध्या एकूण २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे दुष्काळी भागात टँकर उपलब्ध करणे ही एक गरज झाली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून आजपर्यंत एकही टँकर सुरु करावा लागलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा गेल्या वर्षभरापासून टँकरमुक्त आहे. या जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातही आजअखेरपर्यंत एकही टँकर सुरु झालेले नाही. पुढील काळात मागणी येणार का हे लवकरच समजेल.