आंबेगाव तालुक्यात तरुणाची आत्महत्या, चुलता अन् चुलतीला अटक, नेमकं घडलं काय?

पुणे : जमिनीच्या वादातून चुलता आणि चुलतीकडून होणाऱ्या वारंवार त्रासाला कंटाळून पुतण्याने झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा धक्कादायक प्रकार थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे घडला आहे.
निखिल अजय मिंडे (वय. २८) असे मृताचे नाव आहे. . ही घटना मंगळवार दिनांक २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी चुलता संजय नारायण मिंडे व त्याची पत्नी कुंदा मिंडे यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, रोहित मिंडे व त्याचे कुटुंबीय थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे राहतात. रोहित व चुलते संजय मिंडे यांच्यात शेत जमिनीच्या वाटपावरून वाद सुरू आहे. त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल केला असून तो न्यायप्रविष्ठ आहे.
रविवार दिनांक २० रोजी फिर्यादी रोहित आणि निखिल मिंडे, चुलता नारायण मिंडे, कुंदा संजय मिंडे यांच्यात जमिनीच्या वादातून वाद झाला. यावेळी चुलता संजय यांनी रोहित व त्याचा भाऊ निखिल यांच्या विरोधात मंचर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर सुद्धा चुलता व चुलतीने फिर्यादी रोहित आणि निखिल यांना शिवीगाळ केली. त्यामुळे फिर्यादी रोहित, आणि त्याचा भाऊ निखिल मानसिक तणावाखाली होता. सोमवार दिनांक २१ रोजी निखिल हा पाईनमळा येथे शेतीला पाणी भरण्यासाठी गेला होता.
दरम्यान, त्यानंतर मंगळवार दिनांक २२ रोजी थोरांदळे गावच्या हद्दीत निखिल याने जंगलातील झाडाला दोरीने गळफास लावून घेतला. रोहित व त्याचे कुटुंबीय घटनास्थळी गेले असता निखिलने झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे त्यांना आढळून आले.
ग्रामस्थ व कुटुंबियांना त्याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. याप्रकरणी चुलता संजय नारायण मिंडे व त्याची पत्नी कुंदा मिंडे यांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. संजय मिंडे व कुंदा मिंडे (दोघे रा. थोरांदळे कौलीमळा, पाटीलमळा रोड ता. आंबेगाव) यांनी जमिनीच्या वादातून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना मंगळवारी रात्री अटक केली.