साखर निर्यात, साखरेचे उत्पादन, इथेनॉल वाढ!! दुबईतील साखर परिषदेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले मत, 72 देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती

नवी दिल्ली : भारताला आगामी सन 2025-26 वर्षामध्ये साखर निर्यात करावी लागणार आहे, कारण देशामध्ये साखरेचे उत्पादन वाढणार आहे. तसेच देशात पुढच्या वर्षी इथेनॉलचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे. जगातील साखर व इथेनॉल उत्पादनाचा अभ्यास करता, भारताचा साखर व इथेनॉल उत्पादनात जगामध्ये दबदबा कायम आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

दुबई साखर परिषद 2025 ही 72 देशातील 700 प्रतिनिधींच्या उपस्थितीत सध्या सुरू आहे. या साखर परिषदेत ‘आम्ही भारतासाठी पुढे काय पाहतो? ‘या विषयावरील चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चा सत्रातील भारताच्या भूमिकेबद्दल दुबईच्या साखर परिषदेत उत्सुकता दिसून आली. या चर्चासत्राच्या माध्यमातून भारत सरकारची बाजू हर्षवर्धन पाटील यांनी भक्कमपणे मांडली.
चालू सन 24-25 मध्ये भारताने 10 लाख मे. टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. जागतिक साखर बाजारामध्ये भारताच्या साखरेची गुणवत्ता चांगली आहे, त्यामुळे भारताच्या साखरेला जगात मोठी मागणी आहे. भारताने आणखी साखरेची निर्यात करावी, असा सुर या साखर परिषदेतून व्यक्त करण्यात आला.

भारत देशामध्ये साखर ही अत्यावश्यक सेवेमध्ये येते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ग्राहक व कारखानदार या सर्वांचा समन्वय ठेवून भारत सरकारला धोरणे आखावी लागतात. केंद्र सरकार व राज्य सरकारे ही देशातील साखर उद्योगाच्या पाठीशी आहेत, त्यामुळे भारतात गेल्या 8 वर्षांमध्ये इथेनॉलमध्ये झालेली वाढ ही जगात इतरत्र कोणत्याही देशामध्ये झालेले नाही.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज ही भारत देशातील साखर कारखानदारीची फेडरल बॉडी असून, देशातील साखर कारखानदारी, शेतकरी यांना एकत्रित मदत, तांत्रिक सल्ला देण्याचे काम प्रभावीपणे करीत आहे. केंद्र सरकारला साखर उद्योगा संदर्भात धोरणे ठरवावी लागतात, सदरची धोरणे ठरविण्यामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे भारतातील साखर उद्योग हा जगामध्ये पुढे जात आहे. तसेच इथेनॉल उत्पादनात भारत देश जगामध्ये अग्रेसर राहिला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.