अचानक बातमी आली, टिव्हीची केबल तोडली गेली, फोन फ्लाईट मोडवर…, अजितदादांच्या आईपासून निधनाची बातमी अशाप्रकारे लपवली


बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल (बुधवारी, ता २८) विमान अपघातात मृत्यू झाला. काल (बुधवारी, ता २८) सकाळी ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी बारामतीत येत होते.

मात्र बारामती विमानतळावर विमान लॅंड होण्याच्या वेळी त्यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातात अजित पवांरासह विमानातील एकूण ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी समोर येताच राज्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला.

या घटनेनंतर त्यांच्या फार्महाऊसवरील एक मन सुन्न करणारा प्रसंग समोर आला असून, अजित पवार यांच्या आई आशाताई पवार सकाळच्या सुमारास टीव्ही पाहत असतानाच अपघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्या क्षणी फार्महाऊसवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही एकच गोंधळ उडाला होता.

अचानक आलेल्या या बातमीमुळे आशाताईंना काही तरी गंभीर घडल्याची शंका आली होती. मात्र सुरुवातीला त्यांना केवळ किरकोळ अपघात झाला असावा, असे वाटले. तरीही त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि त्या लगेच दादांची विचारपूस करू लागल्या, असे फार्महाऊस मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितले.

पुढे संपत धायगुडे यांनी सांगितलं की, बारामतीमध्ये हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची बातमी टीव्हीवर आली. त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत, यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडला असल्याचं सांगितलं. त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवरती टाकून दिला.

काही झाले नसल्याचे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दादांना भेटून येऊ चला असे म्हणून त्या फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या होत्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचेही सांगितले. पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी नाईलाजाने त्यांना आम्ही बारामती येथील बंगल्यावर घेऊन गेलो, अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाची बातमी शरद पवार यांना कशी द्यावी, यावर पवार कुटुंबीयांमध्ये मोठी अस्वस्थता होती. त्यामुळे सुरुवातीला त्यांना ही माहिती देण्यात आली नव्हती. वैद्यकीय तपासणीसाठी शरद पवार यांना रुग्णालयात नेण्यात आले होते, त्यानंतर घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना अजित पवारांच्या अपघाती निधनाची माहिती दिली.

ही बातमी समजताच शरद पवार तात्काळ बारामतीकडे रवाना झाले. या घटनेने संपूर्ण पवार कुटुंबाला जबर धक्का बसला असून, महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!