पुण्यात खळबळ! विद्यार्थ्यांची डोकी उडतील, आम्ही शाळेत बॉम्ब ठेवलाय, नेमकं घडलं काय?

पुणे : पुण्यात एका शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. औंध भागातील सिटी इंटरनॅशनल स्कूलला ३० जून रोजी सकाळी ११:५० वाजता ईमेलद्वारे धमकी देण्यात आली. शाळेत स्फोटके ठेवल्याचा आणि त्यातून मोठी जीवितहानी करण्याची धमकी देण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपासणी केली. बॉम्ब शोधक पथकानेशाळा सुरक्षित असल्याची खात्री केली असून धमकी देणाऱ्याचा शोध सायबर पोलिसांच्या मदतीने सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सिटी इंटरनॅशनल स्कूल, औंध या शाळेला एक धमकीचा ईमेल आला. शाळेच्या ईमेल आयडीवर हा मेल आला होता. मेलमध्ये लिहिले होते, शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवले आहेत.
सकाळी इमारत रिकामी करा, अन्यथा आत असलेल्या लोकांचे मृत्यू होतील, हात-पाय उडतील किंवा डोकीही उडतील. आम्ही ‘रोडकिल’ आणि ‘क्यो’ या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या, असा उल्लेख सदर मेलमध्ये करण्यात आला होता.
धमकीचा मेल पाहताच प्राचार्या अपूर्वा पाटील यांनी तात्काळ चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कार्यवाही केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ATC आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला देखील बोलावण्यात आले. डिओ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब शोधक पथकाने शाळेची कसून तपासणी केली.
दरम्यान, तपासणीनंतर शाळेत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने लेखी स्वरूपात शाळा सुरक्षित असल्याचं प्रमाणपत्र दिलं. या कारवाईसाठी पोलीस स्टेशनमधील २ अधिकारी आणि १२ कर्मचारी तैनात होते. चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील इतर शाळांनाही सतर्क केले. डीएव्ही पब्लिक स्कूल, औंध आणि लॉयला स्कूल, पाषाण रोड या शाळांना भेट देऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.