विद्यार्थ्यांच्या सहलीची बस दरीत कोसळली, 20 जखमी, प्रकृती गंभीर…

नाशिक : कराड-साताऱ्यात विद्यार्थ्यांच्या सहलीची बस दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे–बंगळुरू महामार्गावरील वाठार गावाजवळ हा भीषण अपघात सकाळी घडला. नाशिकच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघालेली ही बस तब्बल 20 फूट खोल दरीत कोसळली.
तसेच या दुर्घटनेत सुमारे 20 विद्यार्थी जखमी झाले असून पाच विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीचा आनंद क्षणात दु:खात परिवर्तित झाला. आवाज ऐकताच गावकरी घटनास्थळी धावून आले आणि बचावकार्य सुरू झाले.
बसमध्ये एकूण 40 ते 45 विद्यार्थी व शिक्षक प्रवास करत होते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही बस नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बी.पी. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहल होती.

वाहन दरीत कोसळताना मोठा आवाज झाला, ज्यामुळे परिसरात एकच गडबड उडाली. सुदैवाने जागरूक गावकऱ्यांनी धाव घेत तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना बसच्या आतून बाहेर काढण्यासाठी थरारक प्रयत्न करण्यात आले.

अनेक विद्यार्थी किरकोळ जखमी असून, पाच विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे. जखमींना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. रुग्णालयात पालक व नातेवाईकांची गर्दी वाढली आहे.
अपघाताची माहिती मिळताच कराड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी महामार्गावरील रहदारीही सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. बस दरीत कशी कोसळली याचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
