विद्यार्थ्यांना कडक सुरक्षाकवच! शारीरिक शिक्षा, अपमान,छळ झाल्यास शिक्षकांसह शाळांवरही होणार कारवाई


पुणे :विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वसई येथे सहावीतील एका विद्यार्थ्याला 100 उठाबशा करण्यास भाग पाडल्याने झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांसाठी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षकांसह शाळांवरही कारवाई होणार आहे.

नव्या नियमावलीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देण्यास स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शिक्षकांसह शाळा प्रशासनावर थेट कारवाई करण्यात येणार आहे.छडी मारणे, उठाबशा देणे, अपमानास्पद भाषा वापरणे, धमकी देणे, दबाव टाकणे किंवा भीती निर्माण करणे ही सर्व कृत्ये गैरकृत्य ठरविण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना वर्गासमोर अपमानित करणे, वेगळे बसवणे किंवा मानसिक तणाव निर्माण करणे यालाही सक्त मनाई करण्यात आली आहे.

विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने आता सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा, तक्रार निवारण व्यवस्था आणि समुपदेशन सेवा अनिवार्य करण्यात येणार आहेत. एखाद्या गंभीर प्रकारात शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संबंधित व्यवस्थापनावर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

बाल सुरक्षा आराखड्याचे काटेकोर पालन शाळांना बंधनकारक करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी न केल्यास कठोर शिक्षेचा इशारा देण्यात आला आहे.शिस्तीचा प्रश्न उपस्थित होत असताना, शिक्षण विभागाने शिस्त राखण्यासाठी सकारात्मक मार्गदर्शन, समुपदेशन आणि पालकांशी संवाद यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!