अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादळ!15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, सुनेत्रा पवारांना धक्का..

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला होता.या विलिनीकरणाला अजितदादा गटातील बड्या नेत्यांनी जाहीरपणे विरोध केला आहे. मात्र, असं असतानाच अजितदादा गटाच्या एका मंत्र्यानं शरद पवार यांची भेट घेऊन दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे 15 ते 20 आमदार शरद पवार गटात जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील आमदारांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असून 15 ते 20 आमदारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आता मोठा धक्का बसला असून ते काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने थेट विलिनीकरण या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांची भेट गुप्तपणे घेतली असून पक्षातील अस्थिरता आणि भविष्यातील अनिश्चिततेमुळे अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाकडे वळण्याच्या विचारात असल्याचे संकेत मिळत आहेत. काही आमदारांनी तर शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात परत राष्ट्रवादी फुटणार असल्याचं दिसून येत आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर घडलेल्या या घडामोडीमुळे पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनीही शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठी राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.