शरद पवार यांना आता विठ्ठल पांडुरंग म्हणणे थांबवा, वैदिक धर्मसभेने दिला थेट इशारा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षातील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात अध्यक्ष शरद पवार हे आमचे विठ्ठल आणि पांडुरग असल्याचं म्हणत त्यांना बडव्यांनी घेरलं असल्याचा आरोपही केला गेला.
दरम्यान, यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वैदिक धर्मसभेने इशारा दिला आहे. शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधल्यास आंदोलन करू असं वैदिक धर्मसभेने म्हटले आहे.
शरद पवार यांना विठ्ठल, पांडुरंग संबोधले तर आम्ही आंदोलन करू. शरद पवार यांना विठ्ठल म्हटल्यानं देवतांचा अपमान होतो. त्यामुुळे पवार यांना विठ्ठल, पांडुरंग म्हणणे तात्काळ थांबवा असं वैदिक धर्मसभेने म्हटलं आहे.
शरद पवार यांचे आराध्य असलेले फुले, शाहू, आंबेडकर या नावाने त्यांना संबोधले तर आमची काही हरकत नाही असंही वैदिक धर्मसभेने म्हटले.
दरम्यान, शरद पवार यांना बडव्यांनी घेरल्याच्या वक्तव्यावरही वैदिक धर्मसभेने आक्षेप घेतला आहे. बडव्यांचा उल्लेख करू नये. बडवे हे तेराशे वर्षे पुजारी होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख टीका करण्यासाठी करू नये अशी विनंती वैदिक धर्मसभेकडून कऱण्यात आली आहे.