राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ; शिवरस्ते, पाणंद अन वहिवाटेला आता कायदेशीर मान्यता मिळणार…

पुणे : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेचा नुकताच श्रीगणेशा सरकारने केला. आता त्यानंतर ग्रामीण भागातील रस्त्यांना बळकटी देण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवरस्ते, पाणंद आणि वहिवाटेला आता कायदेशीर मान्यता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भविष्यात रस्त्यावरून वाद होऊ नये यासाठी त्याचे डिजिटल रेकॉर्ड सुद्धा ठेवण्यात येणार आहे.भौगोलिक माहिती प्रणालीची मदत घेऊन या शिवरस्त्यांना एक भू-सांकेतिक क्रमांक देण्यात येणार आहे. ग्रामसभेत मंजूर झालेल्या रस्त्यांची माहिती भूमिअभिलेख कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल. तर एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना व्हीआर नंबर देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल. रस्त्याची माहिती नकाशावर सत्यपित करून त्याचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात येणार आहे.

गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणण्यात येतील. नकाशा तयार झाल्यावर पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. विविध १३ योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

