तळेगाव, चाकण, शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावरील उन्नत मार्ग व सहापदरीकरणास राज्य शासनाची मंजुरी! खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश..

शिरूर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील एलिव्हेटेड रस्त्यासाठी सुरू असलेल्या आपल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून राज्य शासनाने मंजुरी दिल्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचे केंद्र बनलेल्या या महामार्गाच्या विकसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशी माहीती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. ते म्हणाले, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचे काम रखडल्यामुळे चाकण व आसपासच्या गावांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेल्या डीपीआरनुसार महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने हा महामार्ग बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांची भेट घेऊन केली होती.
त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. आपल्या या पाठपुराव्यामुळे अखेरीस २२ एप्रिल रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावर तळेगाव ते चाकण दरम्यान चौपदरी रस्ता व उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूर दरम्यान सहापदरी रस्ता बांधण्यास मंजुरी दिली होती.

त्यानुसार बीओटी तत्त्वावर हा महामार्ग बांधण्यात येणार असून राज्य शासनाने तरतूद केलेल्या अपफ्रन्ट रकमेतून चौपदरी व सहापदरी रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. वस्तु व सेवा कर आणि गौण खनिज वगळून या महामार्गाच्या विकसनासाठी सुमारे रु. ३९२३.८९ कोटी रकमेची तरतूद करण्यात आली आहे. आता राज्य शासनाने रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी.
तसेच एमएसआयडीसीने लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हा राष्ट्रीय महामार्ग अपघात आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त करावा. तसेच, शिरुर आणि हडपसर ते ऊरळीकांचन या दोन्ही महामार्गांबाबतही शासनाने तातडीने आदेश निर्गमित करावेत ही नम्र विनंती.