पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली – केंद्रीयमंत्री अमित शहा


नवी मुंबई : वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम आप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केला आहे.

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी अमित शहा बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले,  की, कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाज सेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तीभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असते. आप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन त्यांच्यासारखं लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो, असे ते म्हणाले.

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजापासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक चेतनेच्या जनकांची महाराष्ट्र ही भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम आज नानासाहेब, आप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे.

समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. कर्तृत्वाने दिलेली शिकवण चिरंजीव राहते. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण आप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असल्याचेही शहा म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!