राज्य निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत झेडपीच्या आजी-माजी सदस्यांशी चर्चा करणार!

पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकां घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन दहा दिवसाचा कालावधी लोटून गेला असला तरी राज्य निवडणूक आयु हालचाली करून असल्याने राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत याबाबत चर्चा करण्यासाठी आजी-माजी सदस्यांना आमंत्रित केले आहे.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आजी-माजी सदस्यांना येत्या गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) आमंत्रित केले आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात येत्या गुरुवारी दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयुक्त हे जिल्हा परिषद आजी-माजी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत.

या बैठकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अव्वर सचिव शैलेंद्र वराडे यांनी राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी-माजी संघाचे अध्यक्ष कैलास गोरे यांना लेखी पत्र पाठवले आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुका त्वरीत जाहीर कराव्यात, या मागणीसाठी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटण्याचा निर्णय या महासंघाने घेतला होता आणि भेटीसाठी वेळ देण्याची मागणी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली होती.
दरम्यान, पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार दि. ८ डिसेंबर रोजी निवडणूक आयुक्तांना भेटण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती आजी-सदस्य महासंघाने घेतला होता आणि याबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका त्वरीत जाहीर कराव्यात,अशी मागणी या बैठकीत केली जाणार आहे.
दरम्यान या निवडणुका घेताना जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सभागृहातील एकूण सदस्यसंख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक जागा राखीव राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला केलेली आहे.
