येरवडा कारागृहात ब्लेड मारुन घेऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्येचे कारणही आलं समोर…
पुणे : महिलेचा खून केल्याने जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने स्वत:च्या हातावर खराब ब्लेडने मारुन गंभीर जखमी करुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना येरवडा कारागृहातील खुल्या कारागृहातील मुद्रणालय येथील आतील परिसरात असलेल्या पाण्याच्या हौदाजवळ मंगळवारी (ता.१) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
धनंजय राजाराम दिघे (मुळ रा. गुरुवार पेठ, पुणे) असे या कैद्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, धनंजय दिघे याने रेखा जितेंद्र भंडारी या महिलेचा खून ५ एप्रिल २०१४ मध्ये केला होता. ऐकमेका समोर दोघांची झेरॉक्सची दुकाने होती. त्या वादातून त्याने रेखाचा खून केला होता. त्याला जुलै २०१९ मध्ये जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. तेव्हापासून तो शिक्षा भोगत आहे.
त्याचे वर्तन चांगले असल्याने त्याची खुला कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गेल्या काही दिवसात त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्याने मंगळवारी सकाळी पाण्याच्या हौदासमोर पडलेल्या खराब ब्लेडने स्वत:चे डाव्या हातावर मारुन गंभीर जखमी केले.
दरम्यान, पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उप निरीक्षक लिंगे तपास करीत आहेत.