महायुतीत ठिणगी!कल्याण-डोंबिवलीत भाजपने दिलं शिंदेंना टेन्शन, थेट महापौरपदावर दावा

मुंबई:राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीच बिगुल वाजला असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. भाजपने ८३ जागा आणि ५ वर्षांच्या महापौर पदाची मागणी केल्याने युतीमध्ये ठिणगी पडली आहे. आता समन्वय समितीच्या बैठकीत यावर तोडगा निघणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठीयुती-आघाडी, जागावाटपाची चर्चा होत असताना दुसरीकडे कल्याण डोंबिवलीत भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढवले आहे. त्यामुळे महायुतीतील वातावरण तापू लागले आहे. नुकत्याच झालेल्या बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकांमधील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी थेट ८३ जागा आणि पाच वर्षांसाठी महापौर पदावर दावा ठोकला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात समन्वय साधण्यासाठी १३ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असली, तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे समोर आले आहे. निवडणुकीचे नियोजन आणि जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने ७ आणि शिवसेनेने ६ असे एकूण १३ सदस्य असलेली समन्वय समिती स्थापन केली आहे.

दरम्यान या समितीच्या आतापर्यंत दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. मात्र, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जागावाटपाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच वाढणार आहे.
