पत्नीला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला दगडाने मारहाण ; लोणी काळभोर पोलिस ठाण्यात सासरा व मेव्हणा यांच्यावर गुन्हा दाखल …

लोणी काळभोर : किरकोळ घरगुती भांडणांवरून रागावून माहेरी आलेल्या पत्नीची समजूत काढून सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला सासरच्या मंडळींनी दगडाने मारहाण केल्याची घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सासरा व मेव्हण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक सुनिल पाथरकर (वय ३०, रा. बोरीभडक, येडाई मंदिराच्या पाठीमागे, ता. दौंड जि.पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हरिभाऊ मारुती उपाध्ये (वय ५५) व ओम हरिभाऊ उपाध्ये (वय २०, दोघेही रा. गारूडीवस्ती, लोणी काळभोर ता. हवेली जि.पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाथरकर यांची पत्नी किरकोळ घरगुती भांडणांवरून रागावून माहेरी गेली होती. तिला सासरी घेऊन जाण्यासाठी लोणी काळभोर येथे एक बैठक बोलवली होती. यावेळी पाथरकर व त्यांचे नातेवाईक गेले होते.बैठकित दिपक पाथरकर यांच्या पत्नीला सासरी पाठविण्याच्या कारणावरून भांडण झाले. पाथरकर हे पत्नीला सासरी पाठविण्यासाठी करत होते. परंतु सासू व सासरे मुलीला पाठविण्यास तयार नव्हते. त्यानंतर बैठकीतून उठून माघारी घरी जाण्यासाठी जात असताना, पाथरकर माझ्या पत्नीला तुम्ही नांदण्यासठी पाठवले नाही तर मी पुन्हा माघारी येईन. असे म्हणाले. असे म्हणाल्याचा राग म्हणत धरून हरिभाऊ उपाध्ये यांनी दगड उचलून पाथरकर यांच्या डोक्यात मारला त्यावेळी त्यामुळे डोक्यातून रक्त येवून ते जमीनीवर पडले.

त्यानंतर ओम उपाध्ये याने हाताने मारहाण केली. तसेच दोघांनी मिळून पाथरकर यांच्या आई व आजोबांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. दोघांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निलेश कोल्हे करत आहेत.

