सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला उच्च साखर उतारा विभागातील पुरस्कार जाहीर…

बारामती : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज देशातील बविविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांना पुरस्कार जाहीर केले. देशातील सर्व 260 सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्ली स्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते.
त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन करून त्याआधारे केंद्रीय सह सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे पारितोषिके दिली जातात. याबाबत आज पुरस्कार जाहीर करण्यात आले.
यामध्ये उच्च साखर उतारा विभागातील अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. तालुका बारामती, जि. पुणे या कारखान्याला मिळाला. तसेच विक्रमी ऊस गाळप प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि., ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र) विक्रमी साखर उतारा, कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना लि. जि. कोल्हापूर याठिकाणी मिळाला.
दरम्यान, याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशभरातून 103 सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला.
त्यात महाराष्ट्र 41, उत्तर प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडू मधून प्रत्येकी 12, हरियाणा 10, पंजाब 9 कर्नाटक 5 आणि मध्य प्रदेश व उत्तराखंडमधून प्रत्येकी एक कारखान्याने सहभाग घेतला होता. यामध्ये अनेक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.