सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! बल्करचा टायर फुटला अन् पलटी होऊन थेट गॅरेजमध्ये घुसला, तिघांचा जागीच मृत्यू, घटनेने सगळे हळहळलं..

सोलापूर : अपघाताच्या घटनेत अलीकडे वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापूर शहराजवळ असलेल्या सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर शनिवारी (ता.१५) सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. अपघातामुळे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हाहाकार माजला होता.
तसेच वेगात निघालेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्करचा टायर फुटला आणि बल्कर पलटी होऊन थेट गॅरेजमध्ये घुसला. गॅरेजमध्ये काम करणारे दोन कामगार आणि दुचाकीवर जाणारे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात तोहिद माजीद कुरेशी (वय. २०, रा. सरवदे नगर सोलापूर), आसिफ चांद पाशा बागवान (व. ४५, रा. दर्गे पाटील नगर, हैदराबाद रोड) तसेच विवेकानंद राजकुमार लिंगराज (रा. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. विवेकानंद लिंगराज हे सोलापूर जिल्हा परिषदमध्ये कर्मचारी होते.
मिळालेल्या माहिती नुसार, सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अपघातानंतर भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत, क्रेनच्या सहाय्याने आटोकाट पर्याय करत पलटी झालेल्या बल्कर बाजूला केले आणि बल्कर खाली सापडलेले तीन मृतदेह बाहेर काढले.
शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास बल्कर (क्रमांक एम एच 44 यू 7495) सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने जात होता. बल्करचे टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. टायर फुटल्याने बल्करने दुचाकीला धडक देत तो थेट उजव्या बाजूला असलेल्या गॅरेजमध्ये घुसला.
दरम्यान, यावेळी गॅरेजमध्ये काही लोक बसलेले होते. या सर्व लोकांना बल्करने चिरडले. जखमींवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या परिसरात अपघात झाला, त्या रस्त्यावर वळण मार्ग आहे. हीच बाब या अपघाताला ही कारणीभूत ठरवल्याची प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले आहे.