Solapur News : बार्शीजवळ मराठा आरक्षणासाठी चौघा तरूणांनी केले विष प्राशन, राज्यभरात आत्महत्येच्या घटना सुरूच…
Solapur News : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत. तसेच आरक्षणासाठी राज्यात आत्महत्येच्या घटना सुरूच आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग सोलापूर जिल्ह्यात वाढत असताना बार्शी तालुक्यातील देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चौघाजणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. Solapur News
रणजित ऋषिनाथ मांजरे (वय. २९), प्रशांत मोहन मांजरे (वय. २८), योगेश भारत मांजरे (वय. ४०) आणि दीपक सुरेश पाटील (वय. २६) अशी चौघांची नावे आहेत. हे चौघेही मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होते.
मिळालेल्या माहिती नुसार, समोवारी (ता. ३०) ऑक्टोबर रोजी देवगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. त्यात रणजित मांजरे हा सहभागी झाला होता. दरम्यान, अर्ध्या वाटेत तो मोर्चातून निघून गेला. नंतर त्याने तणनाशक प्राशन केल्याचे त्याच्या काही मित्रांना समजले.
रात्री रणजित मांजरे याने तणनाशक प्राशन केल्यानंतर प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे त्यास बार्शीत एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रशांत मांजरे, दीपक पाटील व योगेश मांजरे हे रूग्णालयात गेले होते.
त्यानंतर त्यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाची कोणतीही दखल घेतली जात नसल्यामुळे उद्विग्न होऊन रूग्णालयाच्या आवारातच विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे तेथे गोंधळ उडाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.