आंदोलनकर्त्याची अजब तऱ्हा ; महापालिकेत चक्क बादलीभर मातीने अंघोळ केली, सोलापूर महापालिकेतील घटना..!


सोलापूर : सोलापूर महापालिकेविरोधात आपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहरात अनेक रस्त्यांचे खोदकाम सुरू करून अर्धवट सोडण्यात आलं आहे. शहरात वाढत असलेल्या धुळीमुळे लोकांना त्रास होत असल्याने आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्यानं थेट बादलीभर माती आणून थेट महापालिकेत अंघोळ केली.

सोलापूर शहरात वाढत असलेल्या धुळीमुळे लोकांना त्रास होत आहे. वाढत्या धुळीमुळे सोलापुरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासनास अनेक लेखी तक्रारी देऊन देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आंदोलनादरम्यान एका आंदोलनकर्त्यानं थेट बादलीभर माती आणून थेट महापालिकेत अंघोळ केली. पोलिसांनी सतर्कता दाखवीत आंदोलनकर्त्यांस रोखले अन् बादली आणि मग जप्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटल, किडवाई चौक अशा अनेक ठिकाणी रस्त्यांचे ड्रेनेजच्या कामासाठी खोदकाम केले आहे. माती रस्त्यावर पडल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. याचा नाहक त्रास या भागातून जाणाऱ्या वाहनधारकांना व व्यापाऱ्यांना होत आहे. निवेदने, पत्र, चर्चा करूनही या तक्रारींकडे महापालिका सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने आम आदमी पक्षाने आक्रमक होत महापालिकेत आयुक्तांच्या केबिनबाहेर आंदोलन केले.

यावेळी शहराध्यक्ष अस्लम शेख शहर मध्य अध्यक्ष जुबेर हिरापुरे, युवाध्यक्ष नीलेश संगेपाग, महिला संघटक अश्विनी गायकवाड, प्रसाद बाबानगरे, मंजूर खानापुरे, भारत अली, नितीन गायकवाड, मदणी चाचा आणि कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अचानक झालेल्या आंदोलनामुळे महापालिकेत काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. यापूर्वीही महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर अनेक आंदोलने झाली. सातत्याने होत असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता आंदोलनकर्त्यांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, महापालिकेत धुळीने अंघोळ करून या बेजबाबदार आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना जाग आणण्याचा प्रयत्न करतोय. तरी देखील जाग न आल्यास महापालिका अधिकाऱ्यांनाच धुळीने अंघोळ घालू असे आम आदमी पार्टी युवाध्यक्ष नीलेश संगेपाग यांनी सांगीतले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!