Solapur : उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता, लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल….

Solapur : सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने एकच खळबळ उडाली होती.
तसेच आता एसीबीने केलेल्या तपासात किरण लोहार यांनी १९९३ ते २०२२ या कार्यकाळात ११२ टक्के अधिकची संपत्ती जमवल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून किरण लोहार, त्यांची पत्नी व मुला विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
किरण आनंद लोहार (वय.५० शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर) पत्नी सुजाता किरण लोहार (वय. ४४), मुलगा निखिल किरण (वय.२५ सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकणी सोलापूर एसीबीचे पोलीस निरीक्षक उमाकांत नेताजी महाडिक यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Solapur
मिळालेल्या माहिती नुसार, किरण लोहार यांनी शिक्षणाधिकारी या पदावर कर्तव्य करीत असताना परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक किमतीची अशी ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
ती त्यांच्या उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अधिक आहे. किरण लोहार यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.