… तर हा मूर्खपणा आहे, छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच, ओबीसी नेत्यांनी भुमिका स्पष्ट करण्यासाठी बैठक घेतली. मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत “मराठा आणि कुणबी एक आहेत, हा मूर्खपणा आहे” असे थेट शब्दांत सांगितले आहे. भुजबळ म्हणाले की, “उच्च न्यायालयानेही स्पष्ट केलं आहे की मराठा समाज मागास नाही आणि त्यामुळे त्यांना ओबीसीतील आरक्षण देता येणार नाही.
जरांगे पाटील यांची मागणी घटनाबाह्य असून, ती समाजात संभ्रम निर्माण करणारी आहे.” त्यांनी यावेळी न्यायालयाचा दाखला देत म्हटलं की, “मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करणं कायद्याच्या चौकटीबाहेरचं आहे.”

दरम्यान, या बैठकीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते उपस्थित होते. भुजबळ म्हणाले की, “सर्व ओबीसी नेत्यांनी एकमताने ठरवलं की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणं मान्य होणार नाही. आमदार गोपीचंद पडळकर परदेशात असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. काही नेते उपोषणस्थळी असल्यामुळे आले नाहीत, पण उपस्थित नेत्यांचं एकमत आहे.
भुजबळ यांनी पाटीदार, जाट, गुर्जर आणि काबू समाजाच्या आंदोलनांचा संदर्भ देत सांगितलं की, या समाजांनीही आरक्षणासाठी संघर्ष केला होता. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण न देता EWS या पर्यायाचा लाभ देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर मराठा समाजालाही आरक्षणाचा मार्ग उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.