… म्हणून मी राजीनामा दिला, राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या पहिल्या टि्वटची चर्चा, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

मात्र वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचे एक कारण धनंजय मुंडे यांनी दिलेआहे. राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर आपल्या राजीनाम्यानंतर त्यांनी पहिलं टि्वट केल्याचे समोर आले आहे.
धनंजय मुंडे यांनी केलेलं टि्वट..
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं की, बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हंटले आहे.