सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार ; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असताना आता महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती.त्यानंतर आता या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे.
या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे.
