दुःखद! अंत्यसंस्काराला गेलेल्या बहिणीने मृत भावाच्या मांडीवरच सोडले प्राण, भावाच्या मृत्यूचा बसला धक्का….!

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील कोर्टा येथील रहिवासी असलेल्या मथुराबाई संभाजी बोरकर (७०) यांचे मोठे भाऊ नामदेवराव साखरे (८०) यांचे अर्धापूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. भावाच्या अंत्यसंस्कारासाठी मथुराबाई अर्धापूर येथे गेल्या होत्या.
तेथे भावाचा मृतदेह पाहताच त्यांना धक्का बसला व या धक्क्यातून त्या सावरल्याच नाहीत. मथुराबाई यांनीही जागीच प्राण सोडले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
एकाच दिवशी बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आयुष्याच्या उत्तरार्धातही नामदेवराव आणि मथुराबाई या भावा-बहिणीतील प्रेमाचा ओलावा कायम होता. आपल्या भावाचे निधन झाल्याचा धक्का बहिणीला सहन झाला नाही.
तीन भावात एक बहीण असल्याने मथुराबाई सर्वांची लाडकी होती. काही दिवसांपूर्वी नामदेवराव साखरे हे आजारी असल्याचे समजल्यामुळे मथुराबाई या अर्धापूर येथे जाऊन आजारी भावाची भेट घेऊन आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भावाला तब्येतीची काळजी घे, नंतर भेटू असे सांगितले होते.