LLB-3 Year CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; दोषींवर कारवाई करण्याची आमदार राहुल कुल यांची राज्य परीक्षा कक्षाकडे मागणी


पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell)घेण्यात आलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादरपूर्वक एकेरी उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, 2 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET ऑनलाइन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते” असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा थोर महापुरुषाचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे आणि एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रकारामुळे तमाम शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परीक्षार्थींनी यासंदर्भात आमदार कुल यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राहुल कुल यांनी आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात पुढील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका संकलित करणारी समिती आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. सीईटी सेलने या गंभीर चुकीबद्दल तातडीने सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा शैक्षणिक परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, याची स्पष्ट नियमावली तयार करावी. इथून पुढे सर्व शैक्षणिक साहित्यात आणि प्रश्नपत्रिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असाच पूर्ण आणि आदरयुक्त उल्लेख करणे अनिवार्य करण्यात यावे. अशा मागण्या आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान कोणत्याही स्तरावर सहन केला जाणार नाही. शैक्षणिक संस्थांनी आणि परीक्षा मंडळांनी अत्यंत जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना असा निष्काळजीपणा होणे चुकीचे आहे. यावर राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी अशी भूमिका आमदार राहुल कुल यांनी मांडली आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!