ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन, ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..
हैदराबाद : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे बुधवारी हैदराबाद येथे निधन झाले आहे. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे.
मालिनी राजूरकर यांनी हैद्राबाद येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मालिनी राजूरकर यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजूरकर यांचे टप्पा व तराणा गायकीवर विशेष प्रभुत्व होते. त्यांनी उपशास्त्रीय तसेच, नाट्यगीतगायनही केले होते. पांडुनृपती जनक जया, नरवर कृष्णासमान ही त्यांची नाट्यगीते रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
राजूरकर यांनी देश-विदेशांत अनेक मैफली गाजवल्या होत्या. पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवासह, मुंबईतील गुणीदास संमेलन, हृदयेश फेस्टिव्हल, ग्वाल्हेर येथील तानसेन समारोह, दिल्ली येथील शंकरलाल फेस्टिव्हल यामध्ये त्यांनी वेळोवेळी कला सादर केली. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या सन्मानार्थ २००१मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.